नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच आपला शत्रू मानलं नाही. राजकीय मुद्द्यांवर ज्यांच्याशी विचार पटत नाहीत, त्यांना देशविरोधी मानलं नसल्याचं अडवाणींनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
LK Advani Blog मध्ये लालकृष्ण अडवाणींनी भाजपमधील सद्य परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आधी देश, मग पक्ष आणि अखेरीस स्वतः' असं या ब्लॉगचं शीर्षक आहे. भाजपचा स्थापना दिवस म्हणजेच 6 एप्रिलची आठवण करुन देत अडवाणींनी आपण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनसंघ या दोन्हीचे संस्थापक सदस्य असल्याचं सांगितलं. गेल्या सत्तर वर्षांपासून देशसेवा करत आल्याचंही अडवाणींनी अधोरेखित केलं.
लालकृष्ण अडवाणी हे गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून गेल्या सलग सहा टर्म खासदार राहिले आहेत. इथल्या मतदारांचे अडवाणींनी आभार व्यक्त केले. 'आधी देश, मग पक्ष आणि अखेरीस स्वतः' हा आपल्या आयुष्याचा मूलमंत्र आहे. आपण तो आयुष्यभर पाळत आलो आहोत, असं अडवाणींनी सांगितलं.
विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच आपला शत्रू मानलं नाही. राजकीय मुद्द्यांवर ज्यांच्याशी विचार पटत नाहीत, त्यांना देशविरोधी मानलं नाही. सत्य, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाहीवर माझ्या पक्षाचा विकास झाला, असंही अडवाणी म्हणतात.
भाजपने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या दिग्गज नेत्यांचं तिकीट कापलं. वाढत्या वयामुळे अडवाणींना उमेदवारी दिली नसल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरमधील मतदारांना पत्र लिहून नाराजी उघड केली होती.
राजकीय विरोधक म्हणजे देशविरोधी किंवा शत्रू नव्हेत, अडवाणींचा ब्लॉग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Apr 2019 09:11 PM (IST)
भाजपचा स्थापना दिवस म्हणजेच 6 एप्रिलची आठवण करुन देत अडवाणींनी आपण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनसंघ या दोन्हीचे संस्थापक सदस्य असल्याचं सांगितलं. गेल्या सत्तर वर्षांपासून देशसेवा करत आल्याचंही अडवाणींनी अधोरेखित केलं.
फोटो सौजन्य ० गेट्टी इमेजेस
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -