मुंबई उपनगरांतला  उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे  मंगेश कुडाळकर हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपच्या पुनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. दोन लाख ७३ हजार मतदार असलेल्या या कुर्ला विधानसभा क्षेत्रात संमिश्र जाती धर्माचे मतदार आहेत. त्यातच हा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदार संघ आहे.

शिवसेनेचे अनेक पॉकेटस असलेले विभाग या मतदार संघात आहेत. त्यात लोकसभेला या मतदार संघातून युतीला चांगली मते मिळाली होती. दुसरीकडे मिलिंद कांबळे सारख्या माजी आमदार असलेल्या नेत्याची काही पक्षश्रेष्टींशी वाकडे असल्याने तिकीट कापलं जाईल अशी देखील चर्चा आहे. तर वंचित बहुजन आघाडी देखील या विभागातून मोठं मतदान घेण्याची शक्यता आहे.

कुर्ला विधानसभेचा इतिहास



२००९ साली या विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे हे ४१ हजार ८९१ मतांनी आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे दुसऱ्या स्थानावर होते. तर २०१४ साली आमदार कुडाळकर यांनी ४१ हजार ५८० मते मिळवून या विधानसभेवर भगवा फडकावला होता. परंतु त्या निवडणुकीत मिलिंद कांबळे यांची प्रचंड घसरण होऊन ते भाजप, एमआयएमनंतर चौथ्या स्थानावर होते.

सद्यस्थितीत आकड्यांची गणिते


दोन लाख ७३ हजार मतदार असलेल्या या कुर्ला मतदार संघात ४० हजारच्या आसपास मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो हे दर निवडणुकीच्या सरासरीतून समोर येते. या विधानसभेत असलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन शिवसेनेचे, दोन भाजपचे तर दोन राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे इथे युतीचे पारडे नक्कीच जड आहे. परंतु गेल्या काही दिवसात मिलिंद कांबळे यांनी पुन्हा त्यांच्या संपर्क जोरदार वाढविल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता कमी आहे. विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता या मतदार संघात एक उमेदवार एकदाच आमदार बनलेला आहे. अशा वेळी या कुर्ल्यात शिवसेना पुन्हा भगवा फडकविणार का ? हा प्रश्न आहे. तर या मतदार संघातील निवडणूक देखील अटीतटीची होणार असं मत या विभागातील जाणकार मांडत आहेत.