मुंबईतील लोकल अपघातात हात गमावल्यानंतर भाजपची 'पोस्टर गर्ल' झालेली मोनिका मोरे मनसेच्या व्यासपीठावर काल आली होती. स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या मोनिकाने भाजपने आपल्याला दिलेलं नोकरीचं आश्वासन हवेतच विरल्याची खंत बोलून दाखवली होती.
मोनिकाला मदत करणं माझं कर्तव्य होतं. मी अकराशे जणांना मदत केली आहे. याला राजकारणाशी जोडू नका. एका वीस वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करायचं असेल, तर देव त्यांना सुबुद्धी देवो. मोनिकाला नोकरीची गरज असेल तर सर्वांनी मदत करायला हवी, राजभाऊंनी सुद्धा केली तर बरं होईल, असा खोचक टोलाही सोमय्यांनी लगावला.
VIDEO | सरकारने पाठ फिरवली, भाजपची 'पोस्टर गर्ल' मोनिका मोरे मनसेच्या मंचावर
महिन्यापूर्वी मोनिका नोकरीसाठी माझ्याकडे आली होती. तिला तीन कॉल आले, एक ऑफर लेटरही आलं होतं, असा दावा किरीट सोमय्यांनी केला. शासकीय नोकरी आणि घराची तरदूत नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी मोनिकाला नोकरी नाकारली होती, असंही यावेळी सोमय्या म्हणाले. त्या काळात मोनिकाला खूप जणांनी मदत केली होती. मोनिकाच्या नावाने मोठी रक्कम बँकेत जमा आहे, असा दावाही सोमय्यांनी केला.
आम्ही मोदी सरकारच्या काळात प्लॅटफॉर्मचीची उंची वाढवली, आता राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली, त्याला आम्ही काय करणार? राज ठाकरे सध्या स्टंटमॅन उर्फ राष्ट्रवादी काँग्रेस झालेले आहेत, अशी टीकाही किरीट सोमय्यांनी केली.
नोकरी-घराचं आश्वासन हवेत, भाजपची 'पोस्टर गर्ल' मोनिका मोरे मनसेच्या मंचावर
पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. खु्द्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोनिकाच्या नावाचं ट्वीट करत तिचं कौतुक केलं होतं. मात्र पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचं आश्वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी ते पूर्ण केला नसल्याचा दावा काल मोनिकाने केला.
काही महिन्यांपूर्वी मोनिकाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. त्यानंतर हाता-तोंडाची गाठ घालण्यात आपल्याला अडचणी येत आहेत. घराचा कारभार आपल्यालाच चालवावा लागत आहे, असं मोनिका काल 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाली होती. भाजपच्या पोस्टरवर झळकलेली मोनिका नोकरी नसल्यामुळे हतबल झाली आहे.