मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यात लेटर वॉर रंगलं आहे. एकमेकांना पत्र लिहून आव्हानं- प्रतिआव्हानं दिली जात आहेत.

यंदाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांसाठी  व्हिडीओ, सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मात्र, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातले उमेदवार मात्र एकमेकांना पत्र लिहून आव्हानं देत आहेत.

राज ठाकरेंच्या सभांविषयी विचारल्यावर संजय निरुपम म्हणतात मला इरिटेट करु नका

काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी या लेटर वॉरची सुरुवात केली आहे. विद्यमान खासदार आणि शिवसेना उमेदवार गजानन किर्तीकर यांना गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा जाब विचारत खुल्या चर्चेचं आव्हान निरुपम यांनी पत्राद्वारे दिलं आहे.


यानंतर किर्तीकर यांनीही संजय निरुपम यांना पत्र पाठवून पाच वर्षात केलेल्या कामांची यादी सोपवली. मग पुन्हा निरुपम यांनी त्यातील काही कामांबाबत आणि खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करुन किर्तीकरांना पत्र पाठवले. यानंतर मात्र, किर्तीकरांनी निरुपमांना उत्तर दिलेलं नाही.



दोन्ही उमेदवारांमधील चुरस आणखी रंगतदार होणार हे मात्र निश्चित आहे. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार आहे.