ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना ठाण्यात महायुतीमध्ये फूट पडल्याचं समोर आलं आहे. वारंवार अपमान झाल्याच्या भावनेतून रिपाइंने महायुतीचे उमेदवार राजन विचारेंचा विरोध करत महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.


ठाण्यात आम्ही शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात आहोत, तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाआघाडीचे उमेदवार आनंद परंजपे यांना आमचा पाठिंबा आहे, असं रिपाइंचे ठाणे उपाध्यक्ष, संघटक आणि प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.

VIDEO | विखे पाटील काँग्रेसला रामराम ठोकणार का? आज फैसला होण्याची शक्यता



वारंवार अपमानास्पद वागणूक मिळते, कोणत्याच बैठका, पत्रकार परिषदा, चौक सभा यांना निमंत्रण दिलं जात नाही, वचननामा, प्रसिद्धी पत्रक यावर कुठेही रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हा प्रमुख रामभाऊ तायडे यांचा फोटो लावला जात नाही, भाषणात 'जय भीम' बोलले जात नाही, स्टेजवर मागे बसवून अपमान केला जातो, यामुळे आम्ही ही भूमिका घेत असल्याचं रिपाइंचे प्रवक्ते विकास चव्हाण यांनी सांगितलं.

याबाबत रामदास आठवले, जिल्हाध्यक्ष यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी आम्हाला असं न करण्यास सांगितलं. मात्र आम्ही अपमान सहन करु शकत नाही. त्यामुळे कारवाई झाली तरी तिला सामोरे जाऊ, पण राजन विचारे यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.