मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटलांना पाठिंबा देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ एडिट करुन बनवल्याचं समोर आलं आहे. 'भाऊ माझ्यापेक्षा जास्त काम करतो', अशा प्रकारचं विधान या व्हिडीओत किरीट सोमय्या करताना दिसत आहेत. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला या संदर्भात तक्रार दिली आहे.




निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतशी उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. त्यात एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या देखील लढविल्या जात आहेत.

उत्तर-पूर्व मुंबईतून भाजपकडून किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारल्यानंतर मनोज कोटक यांचा प्रचार करताना किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाची व्हिडीओ क्लिप एडिट करुन किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे या संदर्भात तक्रार केली आहे.

ह्या व्हिडीओ क्लिपमध्ये किरीट सोमय्या हे 'भाऊ हा माझ्यापेक्षा जास्त काम करतो' अशा प्रकारचं विधान करताना दिसत आहेत. दरम्यान अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करुन राष्ट्रवादीने भ्रमात राहू नये. 29 तारखेला जनता तुमचा भ्रम मोडून काढेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर हा व्हिडीओ आम्ही बनविला नसून ज्या माणसाला पक्षाने नाकारलं त्या माणसाचा वापर आम्ही का करायचा? असा सवाल महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला आहे.