बंगळुरु: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते अशी ओळख असलेले जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम केला असून काँग्रेससमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


भाजपवर टीका करताना जगदीश शेट्टर म्हणाले की, कर्नाटकात भाजपला उभं करण्यात मी मोठी भूमिका बजावली. असं असताना पक्ष नेतृत्वाने माझा पदोपदी अपमान केला. त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून सातव्यांदा विजयी होऊ.


जगदीश शेट्टर हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असून हुबळी-धारवाड मतदारसंघातून त्यांनी सहा वेळा विजय मिळवला आहे. 2017 सालच्या निवडणुकीत त्यांनी 25 हजार मतांनी विजय मिळवला होता. जगदीश शेट्टर हे भाजपच्या येडियुराप्पा यांच्यानंतर लिंगायत समाजाचे दुसरे मोठे नेते असल्याचं मानलं जातं. राज्यातील एक स्वच्छ चारित्र्याचा नेता अशीही त्यांची ओळख आहे. तसेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे उत्तर कर्नाटकातील 20 ते 25 जागांवर परिणाम होणार असल्याचं राजकीय जाणकार म्हणतात. 


जगदीश शेट्टर हे 2012 ते 2013 या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 68 वर्षीय शेट्टर 2008 ते 2009 दरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्षही होते. कित्तूर कर्नाटक (मुंबई कर्नाटक) विभागातील 25 विधानसभा जागांवर शेट्टर यांचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. 


 






कर्नाटकच्या चाव्या लिंगायत समाजाच्या हाती 


2011 च्या जनगणनेनुसार, कर्नाटकची एकूण लोकसंख्या 6.11 कोटी आहे. त्यापैकी सर्वाधिक 5.13 कोटी म्हणजेच 84 टक्के हिंदू आहेत. यानंतर मुस्लिम आहेत ज्यांची लोकसंख्या 79 लाख म्हणजे 12.91 टक्के आहे. राज्यात ख्रिश्चनांची संख्या 11 लाख म्हणजे सुमारे 1.87 टक्के आणि जैन समूदायाची लोकसंख्या 4 लाख म्हणजे 0.72 टक्के आहे.


लिंगायत हा कर्नाटकातील सर्वात मोठा समाज आहे. त्यांची लोकसंख्या सुमारे 18 टक्के आहे. यानंतर, दुसरा सर्वात मोठा समुदाय वोक्कालिंगा आहे. या समूदायाची लोकसंख्या सुमारे 14 टक्के आहे. राज्यात कुरुबा जातीची लोकसंख्या 8 टक्के, एससी 17 टक्के, एसटी 7 टक्के आहे. लिंगायत समाजाची गणना कर्नाटकातील पुढारलेल्या जातींमध्ये केली जाते. लिंगायत आणि वीरशैव हे कर्नाटकातील दोन प्रमुख समूदाय आहेत.


ही बातमी वाचा: