वाशिम : जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराची मोठी चर्चा पहायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीच्या या उमेदवाराने एका हातात शिवबंधन तर दुसऱ्या हातात घड्याळ बांधल्याने सध्या मतदारसंघात हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.


वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश डहाके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे मेव्हणे आहेत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डहाके याचं तिकीट कापत शरद पवार यांचे निकटवर्तीय सुभाष ठाकरे यांना संधी दिल्याने डहाके यांनी नाराजी दाखवत हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधले. मात्र 2019 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्यासाठी विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने डहाके यांना निवडणूक लढवणे कठीण झाले होते. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी हा प्रश्न डहाके यांच्या समोर होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी प्रकाश डहाके यांना पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हा त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्यासमोर माजी राज्य मंत्री सुभाष ठाकरे यांनी शिव बंधन सोडून घड्याळ बांधण्याचा डहाके यांना आग्रह केला. मात्र गेल्या अनके वर्षांपासून सेनेसोबत जोडल्या गेल्याने शिवबंधन हातात कायम आहे आणि मनामध्ये असलेल्या राष्टवादी पक्षाची दुसऱ्या हातावर घड्याळ कायम राहणार, असं यावेळी डहाके यांनी सांगितलं. त्यामुळे प्रकाश डहाके हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे अशीही चर्चा मतदार संघात रंगली आहे.