गुना: काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या के. पी यादव यांनी त्यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. हे के पी यादव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे खास कार्यकर्ते मानले जायचे.
ज्योतिरादित्य यांच्यासोबत सेल्फी काढतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच के पी यादव यांनी शिंदे यांचा गड असलेल्या गुनामधून त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
या मतदारसंघात शिंदे घराण्याच्या तीन पिढ्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे आजी विजयराजे शिंदे 6 वेळा तर वडील माधवराव शिंदे 4 वेळा इथून खासदार राहिले आहेत. तर स्वतः ज्योतिरादित्य 4 वेळा गुना लोकसभा क्षेत्रातून खासदार राहिले आहेत.
अशा मजबूत गड असलेल्या गुनामधून कृष्ण पाल यादव यांनी विजय मिळवला आहे. सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये कृष्ण पाल यादव कारच्या बाहेरून शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.
यादव हे शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जायचे. ज्योतिरादित्य यांच्या निवडणूक आणि प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. गेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना तिकीट दिले जाणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली.
ही उमेदवारी दिल्यानंतर शिंदे पत्नी प्रियदर्शनी यांनीच शिंदे गाडीमध्ये बसलेले असताना केपी यादव हे सेल्फी घेण्याची धडपड करत असतानाचा एक फोटो सोशल मीडियात टाकला होता. प्रियदर्शनी यांनी 'जो व्यक्ती महाराजांसोबत सेल्फी धडपडायचा, त्याला भाजपने तिकीट दिलंय' अशी टीकाही केली होती.
आता ज्यावेळी एक लाखांहून अधिक मतांनी यादव विजयी झाले आहेत, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाच फोटो व्हायरल करायला सुरुवात केली आहे.
सेल्फीसाठी धडपड करणाऱ्या कार्यकर्त्याने ज्योतिरादित्य शिंदेंना पराभूत केले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 May 2019 03:56 PM (IST)
अशा मजबूत गड असलेल्या गुनामधून कृष्ण पाल यादव यांनी विजय मिळवला आहे. सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये कृष्ण पाल यादव कारच्या बाहेरून शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -