रांची : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची चर्चा आहे. सुरुवातीच्या मतमोजणीनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच देशात झारखंड (Jharkhand Vidhan Sabha Election Result) या राज्याची निवडणूक झाली होती. या राज्यातही निवडणुकीचा कल हाती लागतो आहे. मिळालेल्या ताज्या कलानुसार झारखंड राज्यात इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने जात आहे. म्हणजेच झारखंडमध्ये पुन्हा एखदा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या ताज्या कलानुसार झारखंडमध्ये कोणाला किती जागा?
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 81 जागांवर निवडणूक झाली होती. आज येथे मतमोजणी होत आहे. या कलानुसार सध्या येथे इंडिया आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाला 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस पक्षाला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात भाजपाला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राजद हा पक्ष 5 जागांवर पुढे आहे.
राहुल गांधींच्या सभांचा सकारात्मक परिणाम
झारखंडची निवडणूक जिंकण्यासाठी इंडिया आघाडीतील घटकपक्ष झारखंड मुक्ती मोर्चा तसेच काँग्रेसने पूर्ण तकाद पणाला लावली होती. त्यासाठी सभा आणि बैठकांचा धडाका चालू होता. काँग्रेसचे दिल्लीतील नेते राहुल गांधी यांनीदेखील झारखंडमध्ये सभा घेतल्या होत्या. या सभांचा झारखंडमध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसतोय. येथे इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे भाजपाची मात्र पुरती निराशा झाली आहे. येथील जनेतने भाजपाला नाकारल्याचे सध्यातरी दिसत आहे.
हेमंत सोरेन आघाडीवर
झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी बरहैत या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेवर सोरेन आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार हेमंत सोरेन यांना आतापर्यंत 20133 मते आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला 8651 मते मिळाली आहेत. म्हणजेच सोरेन 11482 मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, विजयाच्या दिशेने वाटचाल केल्यामुळे इंडिया आघाडीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा :