मुंबई:  इगतपुरीतून काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा आमदार झालेल्या निर्मला गावित यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे स्थानिक शिवसेना नेते-शिवसैनिक संतप्त आहेत.  गावित यांच्याविरोधात इगतपुरीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यावर 'सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को' असं लिहिलंय. निर्मला गावित या स्वत:ला कार्यसम्राट म्हणवून घेत आल्या आहेत. स्थानिक शिवसैनिक मात्र याची खिल्ली उडवत आहेत. गावितांच्या या सेना प्रवेशामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार काशीनाथ मेंगाल आणि शिवराम झोले खासकरून नाराज असल्याचं बोललं जात आहे.


सेनेत प्रवेश करणाऱ्यांविरोधात असंतोषाचं मुख्य कारण जुन्या नेतृत्वाला तिकिट न मिळण्याची असलेली भीती, हे होय. त्यांना वाटतंय की यंदा नव्यानं पक्षात आलेल्यांना तिकिट दिलं जाईल. गेल्या काही काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून जवळपास ३० मोठे नेते भाजप किंवा शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेत नुकतेच प्रवेशकर्ते झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव आणि शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बलोरा यांची प्रामुख्यानं नावं घ्यावी लागतील. सेनेप्रमाणेच भाजपतही 'बाहेरच्यां'विरूद्ध असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत.


सध्यातरी भाजप-सेनेत युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. कोणत्या फॉर्म्युल्यावर युती व्हावी आणि कुणाला किती जागा सोडायच्या यावरून युतीचं घोंगडं अजूनही भिजत आहे. उद्या (२२ सप्टेंबर) भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत आल्यावर या प्रकरणी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.  तिकिट वाटप हे युती जाहीर झाल्यावर आणि जागांची वाटणी ठरल्यावर केलं जाईल. मात्र, त्याआधीच दोन्ही पक्षांमधील निष्ठावान इच्छुक 'मेगाभरती'वाल्यांवर डुख ठेवून बसू लागलेत.


नुकताच महाराष्ट्रातला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानं आता युती, जागावाटप आणि शेवटी तिकिट वाटप ठरवण्यासाठी भाजप-सेनेला घाई करावी लागणार आहे. त्यामुळेच प्रत्येक इच्छुकाला एकाच संदेशाची अपेक्षा आहे....तुमचं तिकिट पक्कं! कामाला लागा!