वायनाड (केरळ) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सामन्य वागणुकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान अपघात घडला. यामध्ये जखमी झालेल्या पत्रकारांना स्वत: राहुल गांधींनी मदत केली आणि त्यांना अम्ब्युलन्सपर्यंत घेऊन गेले.


वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींचा रोड शो सुरु होता. त्यांच्या या रोड शोला प्रचंड गर्दी होती. या रोड शोचं रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांच्या ट्रकवरील बॅरिकेट तुटलं आणि काही पत्रकार जखमी झाले.

ही बाब प्रियांका गांधींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना याबाबत सांगितलं. राहुल गांधींनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि पत्रकारांपर्यंत पोहोचून त्यांची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांना आधार देत राहुल गांधींनी स्वत: त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत नेलं आणि मग ते आपल्या गाडीत जाऊन बसले.

राहुल गांधींनी कोणाला मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक जखमींना मदत केली होती.



यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठीमध्ये त्यांचा सामना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींसोबत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

वायनाडमध्ये एनडीएचे उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांच्यासोबत राहुल गांधींची मुख्य लढत असेल. तुषार वेल्लापल्ली हे भारत धर्म जन सेनेचे (बीडीजेएस) अध्यक्ष आहेत. केरळमध्ये भाजप आणि बीडीजेएस यांची आघाडी आहे. तुषार वेल्लापल्ली यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. तुषार वेल्लापल्ली यांनी काल वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.