वायनाड (केरळ) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. यावेळी त्यांच्यासोबत बहिण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थोड्याच वेळात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा रोड शोला सुरुवात होईल.


राहुल आणि प्रियांका गांधी बुधवारी (3 एप्रिल) रात्री केरळच्या कोझिकोडमध्ये पोहोचले. यावेळी विमानतळावर केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष की चेन्नीतला, ओमान चांडी, मुल्लापल्ली रामचंद्रन, आययूएमएलचे नेते पी के कुन्हलिकुट्ट आणि ई टी मुहम्मद बशीर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पक्षाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर राहुल आणि प्रियांका विमातळावरुन थेट गेस्ट हाऊसवर पोहोचले.


अमेठी आणि वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठीमध्ये त्यांचा सामना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींसोबत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

VIDEO | राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्ये दाखल | वायनाड | एबीपी माझा



तुषार वेल्लापल्ली यांच्याशी लढत
वायनाडमध्ये एनडीएचे उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांच्यासोबत राहुल गांधींची मुख्य लढत असेल. तुषार वेल्लापल्ली हे भारत धर्म जन सेनेचे (बीडीजेएस) अध्यक्ष आहेत. केरळमध्ये भाजप आणि बीडीजेएस यांची आघाडी आहे. तुषार वेल्लापल्ली यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. तुषार वेल्लापल्ली यांनी काल वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका
दुसरीकडे वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर स्मृती इराणींनी निशाणा साधला आहे. "राहुल गांधींनी 15 वर्षांपासून अमेठीतील जनतेच्या मदतीने सत्तेची मजा घेतली आणि आता ते दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हा अमेठीतील जनतेचा अपमान आहे आणि इथले लोक हे सहन करु शकणार नाही," असं स्मृती इराणी म्हणाल्या.