Ichalkaranji Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सोडवण्यामध्ये महायुतीला यश आलं असलं, तरी इचलकरंजीमध्ये मात्र महायुती होऊन सुद्धा एकमेकांच्या जागांवर एबी फॉर्म देण्याने महायुतीत रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. इचलकरंजी मनपा निवडणुकीत सर्वाधिक जागा घेऊनही भाजपने शिवसेना शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का? अशी सुद्धा चर्चा इचलकरंजी मनपा निवडणुकीच्या रिंगणामध्ये रंगली आहे. इचलकरंजी मनपा निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने अडचण झाली आहे.
महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला 11 जागा मिळाल्या आहेत. मात्र, पाच जागांवर शिवसेना शिंदे गटासह भाजपचे देखील उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारांनी या ठिकाणी माघार नाही घेतली तर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. इचलकरंजीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 10 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीमध्ये 65 जागांसाठी जवळपास 78 फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांसह मतदार सुद्धा गोंधळण्याची शक्यता आहे. इचलकरंजीमधील शेवटच्या क्षणापर्यंत एबी फार्म वाटण्याचा जो घोळ घालण्यात आला ते पाहता महायुतीमध्ये रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून एकूण 56 जणांना उमेदवारी अर्ज देण्यात आली आहे.
तब्बल 13 जागांवर अधिकचे उमेदवार
एकूण 65 जागांसाठी तब्बल 78 एबी फॉर्मचे वाटप केल्याने तब्बल 13 जागांवर अधिकचे उमेदवार आहेत. भाजपने 56 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शिंदेसेनेकडून 10 उमेदवारांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाने तब्बल 12 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. राष्ट्रवादीकडून दोन जागांवर महायुतीचा भाग म्हणून तर दहा जागांवर ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठरलेला फॉर्म्युला आणि प्रत्यक्षात विसंगती
महायुतीतील जागावाटपाचा मूळ फॉर्म्युला आधीच ठरलेला होता. त्यानुसार भाजप 54 आणि शिंदेसेना 11 जागांवर लढणार होती, तर भाजपच्या कोट्यातून दोन जागा राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात भाजपने 56, शिंदेसेना 10 आणि राष्ट्रवादीने 12 जागांवर उमेदवार दिल्याने हा फॉर्म्युला पूर्णपणे बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकाच प्रभागात अनेक उमेदवार
ज्या-ज्या प्रभागांत महायुतीकडून दोन-तीन पक्षांचे उमेदवार उभे आहेत, त्या ठिकाणी उमेदवार ‘गॅस’वर असल्याचे वातावरण आहे. आता माघारीपर्यंत पडद्यामागील वाटाघाटी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ या नावाखाली उमेदवार रिंगणात ठेवून जो निवडून येईल, त्याला महायुतीचा अधिकृत उमेदवार मानले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील हा अंतर्गत कलह आणि अनेक प्रभागांत सहयोगी पक्षांचे स्वतंत्र उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या प्रभागात नेमका महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण, हा प्रश्न मतदारांना पडल्याचे चित्र सध्या इचलकरंजीत दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या