Usman Khawaja Announces Retirement From Cricket : नव्या वर्षाची सुरुवात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठ्या धक्क्याने झाली आहे. इंग्लंडविरुद्धची अॅशेस मालिका आधीच जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. सिडनी येथे होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याच्या अवघ्या काही दिवस आधी ख्वाजाने हा मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे. रविवार, 4 जानेवारीपासून सिडनीत अॅशेस मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळवला जाणार आहे. निवृत्तीच्या घोषणेसोबतच ख्वाजाने सामाजिक भेदभाव या संदर्भातील गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियन क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे.
सिडनीतच झाली सुरुवात, सिडनीतच शेवट
सिडनी कसोटीच्या दोन दिवस आधी, शुक्रवार 2 जानेवारी रोजी, उस्मान ख्वाजांनी पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे, ज्या मैदानावर 2011 मध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला, त्याच सिडनी मैदानावर 14 वर्षांनंतर त्याने निरोप घेतला. ख्वाजाने जानेवारी 2011 मध्येच इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस कसोटीमधून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. सिडनीचे रहिवासी असलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या होम ग्राउंडवरूनच फर्स्ट क्लास क्रिकेटलाही सुरुवात केली होती आणि आता त्याच ठिकाणी कसोटी कारकिर्दीचा शेवट करत आहे.
ख्वाजाचा गंभीर आरोप
निवृत्तीच्या घोषणेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ख्वाजाने ऑस्ट्रेलियन मीडिया आणि काही माजी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली. त्याने आरोप केला की, संपूर्ण कारकिर्दीत जसे झाले, तसेच या अॅशेस मालिकेदरम्यानही फक्त त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, ज्यामध्ये नस्लभेदाचा स्पष्टपणे जाणवते. ख्वाजा म्हणाले, “मी एक क्रिकेटपटू आहे. पण अनेक वेळा मला वेगळं असल्यासारखं वाटलं. माझ्याशी ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली, ज्या गोष्टी घडल्या, त्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. पर्थ कसोटीदरम्यान मला पाठीत जकडण आली होती, जी माझ्या नियंत्रणात नव्हती. मात्र ज्या प्रकारे मीडिया आणि काही माजी खेळाडूंनी माझ्यावर वक्तव्य केले, ते असह्य होतं. दोन दिवस मी ते सहन करू शकत होतो, पण सलग पाच दिवस मला हे झेलावं लागलं आणि तेही माझ्या कामगिरीशी संबंधित नव्हतं.”
पर्थ कसोटीनंतर वादाला तोंड
पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फील्डिंग करताना पाठदुखीमुळे ख्वाजा दोन्ही डावांत फलंदाजी करू शकला नव्हता. या सामन्यापूर्वी तो गोल्फ खेळताना दिसला होता, ज्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. ख्वाजा म्हणाले की,“माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मला अशा वेगळ्या वागणुकीचा सामना करावा लागला आहे. यात अनेकदा सामाजिक भेदभाव आणि जातीवादाची झलक स्पष्टपणे दिसून आली.”
उस्मान ख्वाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 39 वर्षीय पाकिस्तानी वंशाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी 87 सामन्यांपैकी 157 डावांमध्ये 43 च्या सरासरीने 6206 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 1554 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, त्याने नऊ टी-20 सामन्यांमध्ये 241 धावा केल्या आहेत. सध्याच्या अॅशेस मालिकेत, तो पाच डावांमध्ये 30.60 च्या सरासरीने फक्त 153 धावा करू शकला आहे, ज्यामध्ये एक अर्धशतक आहे.