1999 पासून सलग चार वेळा औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे लोकसभेवर निवडून गेले आहेत. सलग वीस वर्षे खासदार राहिलेल्या खैरेंना यावेळी एमआयएमच्या इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचं आव्हान होतं. त्यासोबतच काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत चर्चा राहिली ती चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांचीच.
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीच्या काही फेऱ्यांदरम्यान चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे ही निवडणूक हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्यातच होईल असा अंदाज लावला जात होता. परंतू चंद्रकांत खैरेंनी नंतरच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेत हर्षवर्धन जाधव यांना मागे टाकले. परंतू जलील यांना पराभूत करण्याइतकी मतं खैरेंना मिळू शकली नाही. त्यामुळेच 2014 साली 1 लाख 62 हजार मतांनी निवडून आलेल्या चंद्रकांत खैरेंचा केवळ 4 हजार मतांनी पराभव झाला आहे.
कोणाला किती मतं मिळाली ?
इम्तियाज जलील (वंचित बहुजन आघाडी) : 3,88,957
चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 3,83,918
हर्षवर्धन जाधव (अपक्ष) : 2,83,627
सुभाष झांबड (काँग्रेस) : 91,735
'ट्रॅक्टर'चा फॅक्टर महत्वाचा ठरला
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवत खैरेंना थेट आव्हान दिले. 'ट्रॅक्टर' ही निशाणी घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी 2 लाख 83 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. चंद्रकांत खैरेंना याचाच फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत जावयाला मदत केली असा आरोप देखील खैरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता.
लाव रे व्हिडीओला, लाव रे फटाक्यांनी उत्तर : उद्धव ठाकरे | एबीपी माझा