Vasai Crime : वसई : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपवण्यासाठी आरोपीनं पत्नीचा मृतदेह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या वाहनातून भावाच्या घरी नेला आणि खोटा मृत्यू दाखला बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.
वसई (Vasai News) पूर्वेच्या कामण येथे राहणाऱ्या ईस्माईल अब्दुल कयुम (24) याचं नुकतंच खुर्शिदा खातून (21) हिच्या सोबत लग्न झालं होतं. ईस्माल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणानं दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. बुधवारी ईस्माल घरी आला असता पत्नीला एका इसमासोबत पाहिलं. त्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी ईस्माईलनं ओढणीनं खुर्शिदाचा गळा आवळून हत्या केली.
तिचा मृतदेह खासगी वाहनात टाकून नवजीवन येथे राहणाऱ्या भावाकडे घेऊन आला. पत्नीची हत्या दडवण्यासाठी ईस्माईलनं बनाव रचला. तिच्या पोटात दुखत असल्यानं मृत्यू झाल्याची खोटी माहिती त्यानं पत्नीच्या पुण्यात राहणाऱ्या भावाला दिली. दरम्यान, डॉक्टरांकडून बनवाट मृत्यू दाखला ही बनविण्याचा प्रयत्न करू लागला.
बुधवारी रात्री मयत खुर्शिदाचा भाऊ मोहम्मद चौधरी घरी आला. मात्र, आपली बहीण आजारी नव्हती मग अचानक तिच्या पोटात कसं दुखू लागलं आणि पोटाच्या दुखण्यानं मृत्यू कसा झाला? याबाबत त्याला संशय आला. त्यामुळे त्यानं मृतदेहाच्या शवविच्छेदनाची मागणी केली. याच काळात मृत्यू दाखला बनवणाऱ्या डॉक्टरांनीही संशय व्यक्त केला आणि ही बाब पेल्हार पोलिसांना समजली. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, असता ईल्माईलनंच आपल्या पत्नीची हत्या केल्याचं उघडकीस आलं. हत्या नायगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्यानं आरोपीला नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली आहे.
आरोपी ईस्माईल याने भावाला पत्नीची हत्या केल्याचे सांगितले होते. त्यांनी देखील ही बाब पोलिसांनं न सांगता दडवून ठेवली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आम्ही आरोपी ईस्माईल कयुम आणि त्याचा भाऊ मुश्ताक कयुम या दोघांना हत्येच्या प्रकऱणात अटक केल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे.