मुंबई : भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: काकडे यांनी दिली आहे. काकडे यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली. परंतु या भेटीनंतरही आपण काँग्रेसमध्ये जाण्यावर ठाम असल्याचे काकडे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.


आज काकडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि सुभाष देशमुखांनी काकडेंची मनधऱणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर असे बोलले जात होते की, सुभाष देशमुखांच्या शिष्टाईला यश आले आहे. त्यामुळे काकडे भाजपमध्येच राहतील. परंतु या बैठकीनंतर काकडे यांनी आपण काँग्रेस प्रवेशावर ठाम असल्याचे सांगितले.

आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीबाबत बोलताना काकडे म्हणाले की, "मुख्यमंत्री माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याशी भेटीगाठी होतच राहतील. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटलो असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणारच आहे."

दरम्यान कांग्रेस प्रवेशाबाबत काकडे म्हणाले की, "मागील दोन दिवस मी दिल्लीत होतो. मी तिथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलो. मला काँग्रेस पक्षात काम करायचे आहे, असे त्यांना सांगितले. त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले. लवकरात लवकर माझा प्रवेश करुन घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे."
काकडे काँग्रेसच्या तिकीटावर पुणे लोकसभेची जागा लढण्याची शक्यता आहे.