बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटे बोलत होते. देशात आणि राज्यात भाजपसोबत असणार, मात्र बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं विनायक मेटेंनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत असेन, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली होती. परंतु अशी भूमिका चालणार नाही, असा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला. मात्र तरीही विनायक मेटे मागे हटले नाहीत. शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज जाहीर मेळावा घेऊन, मेटेंनी बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली.
आपल्या संपूर्ण भाषणात विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर कडाडून टीका केली. जनावरांच्या छावण्यात राजकारण करणारे हे मुंडे साहेबांचे वारस असू शकत नाहीत. तसंच साडेचार वर्षात तीन वेळा आपल्या मंत्रीपदाचा पंकजा मुंडे यांनी कसा विरोध केला याचा पाढाही त्यांनी वाचला. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे चांगले आहेत. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी साथ देणार असल्याचंही मेटेंनी जाहीर केलं.
बीडमध्ये विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीतयुद्ध यापूर्वीही पाहायला मिळाले होते. मात्र निवडणूक काळात थेट भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे आता मेटेंबाबत भाजप काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल.
बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा प्रचार करणार : विनायक मेटे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2019 06:07 PM (IST)
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत असेन, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली होती. परंतु अशी भूमिका चालणार नाही, असा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -