मुंबई: देवेंद्र फडणवीस यांना 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेबाबत काय वाटतं ते मला माहिती नाही. मात्र, मला 'बटेंगे तो कटेंगे' ला विरोध असल्याचे रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. 'बटेंगे तो कटेंगे'ला आम्ही सगळ्यांनी विरोध केला आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे, महाजन यांनीही 'बटेंगे तो कटेंगे'ला (Batenge to Katenge) विरोध केल्याचे माझ्या कानावर आले. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि 'बटेंगे तो कटेंगे'बोलतात. आम्ही लगेच त्याला विरोध केला. आम्ही सांगितले की, हा उत्तर प्रदेश नाही. हे उत्तरेत चालत असेल. पण आमच्या महाराष्ट्रात शिव-शाहू-आंबेडकरांची विचारधारा चालते. मी जेव्हापासून राजकारणात आलोय तेव्हापासून पाहतोय महाराष्ट्र दुसरी कोणतीही विचारधारा स्वीकारत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. ते शुक्रवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.


या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेबाबात देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. फडणवीस म्हणतात की, हे ऐतिहासिक सत्य आहे. जेव्हा हिंदू एकत्र राहत नाहीत, तेव्हा त्यांची लोकसंख्या कमी होते. त्यांच्याविरोधातील हिंसा वाढते, असे फडणवीसांनी म्हटल्याकडे अजित पवारांचे लक्ष वेधण्यात आले. यावर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, आपण वेगवेगळ्या लोकांना मुलाखत देतो, तिकडे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यावर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय आहे, हे मला माहिती नाही. पण मी तुम्हाला माझं उत्तर दिलंय की, 'बटेंगे तो कटेंगे' हे मला पसंत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.


लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार 400 पार' नरेटिव्ह मिसफायर झालं: अजित पवार


या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेल्या 'अबकी बार 400 पार' घोषणेचे नरेटिव्ह पूर्णपणे मिसफायर झाल्याचे सांगितले. देशातील प्रत्येक भागाची विचार करायची पद्धत वेगळी असते. लोकसभेला महाराष्ट्रात आम्हाला 0.6 टक्के मतं कमी पडली. तरी महायुती इतक्या सीट हारली. मग आम्ही बसलो आणि विचार केला कुठे चुकलं? अबकी बार 400 पार एवढं मिसफायर झालं. विरोधी पक्षातील लोक म्हणाले बहुमतासाठी 275 जागा गरजेच्या आहेत, तरी यांना समाधान मिळत नाही. यांना 400 जागा संविधान बदलण्यासाठी हवे, असा प्रचार करण्यात आला. 400 जागा मिळाल्यावर फक्त हिंदूंना मतदानाचा अधिकार राहील, असाही प्रचार झाला. आम्ही खूपदा सांगितलं असं काहीही होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदललं जाणार नाही. पण लोकांनी ऐकलं नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.




आणखी वाचा


विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार