पुणे : "माझी छाती 56 इंचांची नाही, पण माझ्या मनगटात दम आहे," असे बोलून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी सभेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.


शरद पवार म्हणाले की, "आजच्या भाषणात अजित एक गोष्ट बोलला, जी मला अजिबात आवडली नाही. तो म्हणाला की, या वयात साहेब फिरत आहेत. म्हणजे मी काय म्हातारा झालोय व्हय? आपल्याला हे बिलकुल आवडलेलं नाही. मी देशात बदल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ठीक आहे माझी छाती 56 इंचांची नाही, पण माझ्या मनगटात दम आहे. मी बदल घडवेन, मी राज्यसभेत आहेच, एकटाच पुरेसा आहे. यशवंतराव चव्हाणांचा वारसा आम्ही चालवला, पण यापुढची 25 वर्ष चालवण्यासाठी नवी पिढीच हवी आहे. ही पीढी घडवण्यासाठी आगामी निवडणूक महत्वाची आहे."

पार्थ पवारांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "1991 साली अजित पवार नवखे होते, तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिली, तुमच्या पाठिंब्याने ते दिल्लीत गेले. तेव्हापासून ते जनतेसाठी झटत आहेत. तीच संधी पार्थला मिळाली आहे. त्याच्याकडूनही या संधीचं सोनं करुन घेतलं जाईल. तरुण वयात संधी मिळणे चांगलंच असतं. कारण मी पार्थपेक्षा दोन वर्षांनी लहान होतो, तेव्हापासून 14 निवडणुकांमध्ये मला निवडून दिलं, त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे."

व्हिडीओ पाहा