सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने बेताल वक्तव्ये करत आहेत. आता त्यामध्ये भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या नावाची भर पडली आहे. सुट्टीच्या काळात देवदर्शनाला जाऊ नका. देव तुमच्याशी बोलणार नाही, मी तुमचा बोलणारा देव आहे, असे विधान सिद्धेश्वर स्वामी यांनी केले आहे. जय सिद्धेश्वर म्हणाले की, "निवडणुकीच्या काळात सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवसात देवदर्शनाला जाऊ नका. देवाला गेलात तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव भेटणार नाही, भेटला तर तुमच्याशी बोलणार नाही, बोलला तर म्हणेल आल्या पावली पत जा. तुमचे पैसे खर्च होतील, परंतु समाधान मिळणार नाही. देवाला जा-देवीला जा, कुठेही जा, तुळजाभवानीला जा किंवा पंढरपूरला जा, तिथे देव भेटणार नाही, तो बोलणार नाही. पण बोलणारा देव मी आहे." सिद्धेश्वर यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे. परंतु विरोधकांना टीका करण्यासाठी हे आयतं कोलित मिळालं आहे. VIDEO : पाहा काय म्हणाले जय सिद्धेश्वर? जय सिद्धेश्वर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर सोलापूरमधून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. VIDEO | तुळजाभवानी, विठ्ठल नाही... बोलणारा देव मीच, भाजप उमेदवारांचं वादग्रस्त विधान | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा