राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जात आहेत. विरोधी पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. असं असताना ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने आज राज ठाकरे यांच्या अमंत्रणावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसले होते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाल्यावर विरोधी पक्षाचे नेते विधानसभेला एकत्र येत असल्याचे यानिमित्ताने आज स्पष्ट झाले.


हे जुळून कसे आले?
लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला. राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की अनेक ठिकाणी राजू शेट्टी यांना लोकांनी निवडणूक लढवण्यायासाठी पैसे दिले, पण मत दिले नाही. इचलकरंजीमध्ये काही बूथ वर राजू शेट्टी यांना अपेक्षित मतं मिळाली नाहीत. त्यामुळे ईव्हीएम मशीन विरोधात राजू शेट्टी आंदोलनाच्या पवित्र्यात होते. राज ठाकरे यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली होती. राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि शहरी भागात राज ठाकरे आणि ग्रामीण भागात राजू शेट्टी यांनी ईव्हीएमबाबत आंदोलन करावे अशी चर्चा झाली. परंतू हे आंदोलन फक्त दोन पक्षांपुरते न राहता इतर विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला. नारायण राणे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चर्चा केली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा ईव्हीएमला विरोध नव्हता. 'ईव्हीएमचा मुद्दा उचलला तर कार्यकर्ते मनाने खचतात, कितीही काम केलं तरी ईव्हीएम मॅनेज होत असेल तर काम कशाला करायचं ही निराशा कार्यकर्त्यांच्या मनात येते', असं अजित पवार यांना वाटत असल्याने ते हा मुद्दा उचलण्यास इच्छूक नव्हते.


राजू शेट्टी, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि आजच्या पत्रकार परिषदेचा अजेंडा ठरला.


ईव्हीएम मशीन विरोधात 21 ऑगस्टला गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदान किंवा आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत तालुका पातळीवर, गावागावात ईव्हीएमबाबत प्रचार करण्याचे ठरले आहे.


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये, विरोधकांनी एकत्र यावे यासाठी राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.


यात नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येईल का? 



Photo by Getty Images



ईव्हीएम मशीनविरोधात नारायण राणे यांनी देखील भूमिका मांडली होती. परंतू ते या मोर्चामध्ये सहभागी होतील की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही.



परंतू ईव्हीएम मशीन हे निमित्त असलं तरी ह्यातून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला सुरुवात केली आहे. ही विरोधकांची आघाडी भाजप आणि शिवसेनेचे आव्हान पेलू शकेल का? निवडणुकीत ही आघाडी टिकेल का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.