मावळ : राजकारण सोडलं तर बहुतांश वेळा पुढाऱ्यांमध्ये कधीच वैर पहायला मिळत नाही. याचा प्रत्यय मावळ लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुलगा पार्थ पवारचे प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे, मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे एकाच मंचावर आलेले दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी अजित पवार आणि बाळा भेगडे हे मुक्तसंवाद करताना दिसले. मात्र याचवेळी श्रीरंग बारणे हे शेजारी बसलेले असताना त्यांनी एकमेकांशी बोलणं तर दूर एकमेकांकडे पाहिलं देखील नाही.


पुण्याच्या कान्हे फाटा येथील सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रसंग पाहायला मिळाला. काल मावळ मतदारसंघात एकाच छताखाली 135 जोडपी विवाहबंधनात अडकली. यावेळी अजित पवारांनी इथं उपस्थिती लावण्याची आणि अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची नामी संधी सोडली नाही. विवाहस्थळी सर्वात आधी ते उपस्थित झाले. त्यानंतर स्थानिक भाजप आमदार बाळा भेगडे यांचं आगमन झालं.

प्रचाराच्या रणधुमाळीत पवार कुटुंबीयांना जिल्ह्यातून हद्दपार करू असं जाहीर वक्तव्य करणारे भेगडे थेट अजित पवारांच्या शेजारी बसले. यामुळे साहाजिकच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवत दोघे एकमेकांशी मुक्त संवाद साधताना दिसून आले.

तितक्यात मुलगा पार्थ पवारांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीरंग बारणे देखील प्रचाराच्या निमित्ताने इथे दाखल झाले. ते ही अजित पवारांच्या शेजारी असणाऱ्या रिकाम्या खुर्चीवर येऊन बसले. संत तुकोबांच्या मंदिरात असो की निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी पार्थशी हस्तांदोलन करत जसं बारणेंनी संवाद साधला तसंच अजित पवारांशी ते संवाद साधतील अशी अपेक्षा होती. पण याउलट घडलं, दोघांनी एकमेकांशी बोलायचं सोडा, एकमेकांकडे पाहिलं ही नाही. मात्र या तिघांच्या अशा एकत्रित येण्याने लग्नमंडपात एकच चर्चा सुरु होती.