अकोला : राज्यात एकीकडे अनेक अनैसर्गिक युती पाहायला मिळत असताना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तसं न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून भाजपने आणि एमआयएमने त्यांच्या नगरसेवकांना सक्त बजावलं आहे. असं असलं तरी अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेत (Hiwarkhed Municipal Council) मात्र भाजप उमेदवाराच्या मदतीसाठी काँग्रेस आणि एमआयएमचा नगरसेवक धावल्याचं दिसून आलं. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक मिळाल्याचं दिसून आलं.
हिवरखेड नगर परिषदेत वेगवेगळ्या पदासाठी निवडणुका पार पडल्या. बाल कल्याण समितीच्या उपसभापतीपदासाठी भाजपकडून महिला उमेदवार म्हणून अनिता वाकोडे यांनी अर्ज भरला. त्यांच्या नामनिर्देशित अर्जाच्या सूचकामध्ये काँग्रेसचे नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान आहेत. तर एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचं नाव अनुमोदक म्हणून आहे. त्याचे पुरावे देखील समोर आले आहेत.
दरम्यान, एमआयएमकडून अनुमोदक आणि काँग्रेसकडून सूचकाचं भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रात नावे असल्याने त्याची चांगलीच चर्चा सुरू झाल्याचं दिसंतय. या प्रकारानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.
हिवरखेड नगरपालिका पालिका पक्षीय बलाबल :
नगराध्यक्ष विजयी उमेदवार : सुलभा दुतोंडे (भाजप)
एकूण जागा : 20
भाजप : 11शिंदेसेना : 05काँग्रेस : 02वंचित : 01एम़आयएम : 01
भाजप आणि एमआयएमकडून सूचना
अकोट नगरपालिकेमध्ये भाजप आणि एमआयएमने एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्याचा प्रकार घडला होता. तर दुसरीकडे बदलापूरमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. या दोन्ही घटनांनंतर भाजपवर जोरदार टीका सुरू झाली आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना सक्त सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती करू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी दुसरीकडे, एमआयएमनेही त्यांच्या नवनियुक्त नगरसेवकांना भाजपसोबत न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आता अकोल्यातील हिवरखेडमध्ये भाजपच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक झाल्यानंतर पुढे त्यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: