चंद्रपूर : राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजप महायुतीला (BJP)आपलं वर्चस्व मिळवता आल्या नाहीत, त्यापैकी एक म्हणजे विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) महानगरपालिका. येथील महापालिकेत 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, काँग्रेसला मॅजिक फिगर गाठता आला नाही, 66 जागांचे संख्याबळ असलेल्या या महापालिकेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे, काँग्रेसला 4 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौर बनवता येईल. मात्र, 30 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्येच (Congress) दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, विजय वडेट्टीवर यांनी चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांचे जबरदस्तीने उचलून नेले असा गंभीर आरोप प्रतिभा धनोरकर यांनी केला आहे.
खरंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्ता सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा होता. मात्र, त्यांनी नगरसेवकांना घरातून उचलून गटबाजी सुरु केलीय, असे करायला नको होते. त्यामुळे उर्वरित नगरसेवक सुरक्षित राहावे, यासाठी आम्ही त्यांना हॉटेलला हलवले आहे, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसची गटबाजी समोर आली आहे. चंद्रपूर हा माझा लोकसभा मतदार संघ आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये ही आमची मागणी आहे. नाहीतर उद्याला आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात ढवळाढवळ करू, असा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिला. तसेच, आमची मागणी पक्षाने मान्य केली नाही, पक्षाला आमची गरज नसेल तर मग आम्ही सामूहिक राजीनामा देऊ, अशी परखड भूमिकाही प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. त्यामुळे, चंद्रपूर महापालिकेतील विजयानंतर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
भाजपकडून ऑपरेशन लोटसचा प्रयत्न
भाजपचे 24 नगरसेवक चंद्रपुरात निवडून आले आहेत. निवडून आलेले सर्व 24 नगरसेवकांचा एकत्रितरित्या सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि माझ्या उपस्थितीत सत्कार झाला. दुसरीकडे काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आल्यानंतरही स्पर्धा लागली आहे. फक्त सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे दोन गट निर्माण होताना दिसत आहे. दोन्ही नेते (वडेट्टीवार आणि धानोरकर) नगरसेवकांची पळवापळवी करत आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आमचे मार्गदर्शक नेते सुधीर मुनगंटीवार भाजपची सत्ता येऊ शकते का यासाठी प्रयत्न करत आहे, असे चंद्रपुरातील भाजप नेते जोरगेवार यांनी म्हटलं आहे.
