मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच, राजकीय पक्षात नेतेमंडळींची जत्राच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात किंवा संधी मिळेल त्या पक्षात प्रवेशाची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला रामराम करुन काहीजण जात आहेत. तर, काहीजण पक्षात प्रवेशही करत आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या (Ajit pawar) उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं होतं. त्यामुळे, सेलिब्रिटी, अभिनेते किंवा खेळाडू देखील राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत. त्यातच, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. यावेळी, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पैलवान चित्रपटातील 'पैलवान गीत' लाँच केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या हस्ते पैलवान चित्रपटातील 'पैलवान गीत' लाँच झालं आहे. 'महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे गाणे' आहे. 'पैलवान'मुळे महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय.
हिंद केसरी दिनानाथ सिंह यांच्यासह आबा काळे (मुंबई केसरी), सागर गरुड (उपमहाराष्ट्र केसरी), अमोल बराटे (हिंद केसरी), युवराज वहाग (दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी), सोनबा काळे (पुणे महापौर केसरी), अक्षय गरुड (युवा महाराष्ट्र केसरी), अक्षय हिरगुडे (हिंद केसरी, सुवर्णपदक विजेते) आणि ऋषिकेश भांडे (महाराष्ट्र चॅम्पियन) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पैलवानांची रांग लागल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, अजित पवारांच्याहस्ते लाँच करण्यात आलेलं पैलवान गीत हे प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेले पैलवान गाणे ब्रह्मा आणि भूषण विश्वनाथ यांनी संगीतबद्ध केले असून, मनीष महाजन यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनेता अंकित मोहन हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. महाराष्ट्राच्या मातीशी आणि सांस्कृतिक वारशाशी असलेल्या या गाण्याचे अजित पवार यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या पारंपारिक कुस्ती संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी हे गाणे समर्पित केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण लहामटे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते.
हेही वाचा
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं