शिमला: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Election Result 2022) 40 जागा जिंकून काँग्रेसने (Congress) बाजी मारली आहे. हिमाचलमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता काँग्रेस अंतर्गत हालचालींना वेग आला असून अनेकजण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. आपलीच वर्णी मुख्यमंत्रीपदी लागावी यासाठी अनेकजणांनी लॉबिंगही सुरू केली आहे. या सर्वामध्ये सर्वात पुढे नाव आहे ते प्रतिभा सिंह (Pratibha Singh) यांचे. प्रतिभा सिंह या हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत, तसेच त्या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर, काँग्रेसने गड काबीज केल्यानंतर प्रतिभा सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपने काँग्रेसमधील आमदार फोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा असताना प्रतिभा सिंह म्हणाल्या की, "लोकांनी आपल्याला स्पष्ट बहुमत दिलं आहे, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. जे जिंकले आहेत ते आमच्यासोबत राहतील, आणि हिमाचलमध्ये आम्हीच सरकार बनवू."
मी मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार, प्रतिभा सिंह यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्रीपदासाठी आपण दावेदार असल्याचं प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे. हिमाचलचा मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी वीरभद्र सिहं यांच्या नावाचा वापर केला आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं प्रतिभा सिंह म्हणाल्या.
मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या प्रतिभा सिंह यांनी विधानसभेची निवडणूक लढवली नाही. पण त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसने वीरभद्र सिंह यांच्या चेहऱ्याचा वापर केला आहे.
प्रतिभा सिंह यांच्यासोबत सुखविंदर सिंह सुक्ख्यू, मुकेश अग्निहोत्री, ठाकुर कौल सिंह, आशा कुमारी ही नावं देखील मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.
Gujarat election result 2022: गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपने (BJP) बाजी मारली असून जवळपास 156 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचा विजय हा ऐतिहासिक असा आहे. येत्या 12 डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुजरातमध्ये 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. भाजपला मिळालेल्या या ऐतिहासिक यशाचा जल्लोष मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याची माहिती आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या शपथविधीचा मेगा शो करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयात जाणार आहेत.