मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील नाराजांचं आऊटगोईंग सुरुच आहे. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील  प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतंच काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता. ट्विटरवरुनही चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली होती.



प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियांका चतुर्वेदी हा काँग्रेसचा राष्ट्रीय चेहरा असल्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसू शकतो.


कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी?

प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. पुस्तकांची समीक्षा करणारा चतुर्वेदींचा ब्लॉग हा देशभरातील टॉप टेन वेबब्लॉग्जपैकी एक मानला जातो.

मे 2013 मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर काँग्रेस पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यात त्या अग्रेसर असतात. रणदीप सुरजेवालांच्या नेतृत्वातील 'कम्युनिकेशन विभागा'च्या त्या सदस्या आहेत.