Nashik Sinner Accident : सिन्नर  (Sinner) शहर परिसरातून अपघाताची घटना समोर आली असून दहावीच्या पहिला पेपर देण्यासाठी जात असलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर शहराजवळील पांढुर्ली येथे परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिला पेपर देण्यासाठी जात असताना दोन मित्राचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


परीक्षेला जाता अपघात


नाशिक (Nashik) ते सिन्नर तसेच सिन्नर-शिर्डी हायवे हा अपघाताला (Accident) सातत्याने निमंत्रण देणारा ठरत आहे. काही महिन्यांपूर्वीच सिन्नरच्या मोहदरी घाटात पाच मित्राचा अपघाती मृत्यू झाला होता. अशातच आजपासून दहावीच्या परीक्षा (SSC Exam) सुरु झाली आहेत. आज पहिला मराठीचा पेपर होता. हाच पेपर देण्यासाठी आगासखिंड येथील दोन विद्यार्थी पांढुर्ली येथे परीक्षा केंद्र असल्याने तिकडे निघाले होते. वाटेत मात्र या दोन मित्रांचा करुण अंत (Death) झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून दहावीच्या परीक्षेपूर्वीच अशा पद्धतीने अपघात झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 


अधिक माहिती अशी की आगासखिंड येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकणारे (SSC Exam) विद्यार्थी परीक्षेसाठी पांढुर्ली येथील परीक्षा केंद्राकडे येत असताना झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज (2 मार्च) आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे या दोघांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.


आगासखिंड गावावर शोककळा... 


सिन्नर घोटी हायवेवर आगासखिंड शिवारात सकाळी दहा वाजेच्या सुमारास एचपी गॅस टँकर आणि अॅक्टिवा यांच्यात भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुलांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावाच्या काही अंतर पुढे गेल्यावर डीएड कॉलेजसमोर त्यांची गाडी गॅस टँकरला धडकली आणि दोन्ही मित्रांचा जागीचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.