हातकणंगले : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडून लाखाहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना 582060 मतं मिळाली तर राजू शेट्टी यांना 486042 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांना 122646 इतकी मतं मिळाली.


हातकणंगले मतदारसंघासाठी 17 उमेदवार मैदानात होते.  2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होते. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींनी त्यांचा पराभव केला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना  4,81,025 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना 3,85,965 मतं  मिळाली होती.  2014 च्या लोकसभेत राजू शेट्टी यांना 6,40,428 मतं मिळाली होती, काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4,62,618 मतं  मिळाली होती. यावेळी मात्र शेट्टी यांना गेल्यावेळीपेक्षा जवळपास दोन लाख मतं कमी मिळाली.



या धंदेवाईक राजकारणामध्ये शेतकऱ्यांचा कुणी वाली असणार नाही.  म्हणूनच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आपल्याला आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.

अनेकांनी मी निवडून यावं म्हणून प्रयत्न केले. अनेकांनी वर्गणी दिली. आतापर्यंत माझ्या सगळ्या निवडणुका पैसे शिल्लक ठेवून लढलो. ज्यांनी माझ्यासाठी पायाला चिंध्या लावून प्रचार केला, त्यांचे आभार मानतो, असे शेट्टी म्हणाले.

संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही

या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीचे पूर्ण सहकार्य लाभले. विजयाच्या जवळ पोहोचू शकलो नाही मात्र जो निकाल आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे ते म्हणाले. मी लोकशाहीवर प्रेम करतो. या महाराष्ट्रावर फुले, शाहू, आंबेडकरांचे संस्कार आहेत. ते संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले.

आता पराभूत झालो म्हणून निराश व्हायचे कारण नाही. विचारांना मरण नसत, विचारांमध्ये ताकद असते. या विचारांसाठी गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकरांसारख्या माणसांना मरण पत्करावा लागले आहे. आपल्याला तर साधा पराभव पत्करावा लागला आहे, असे ते म्हणाले.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, डोक्यात राग घालून घेऊ नका. गेली 20-25 वर्ष मी तुमच्यावर केलेले संस्कार तकलादू नव्हते हे लक्षात घ्या. डोक्यात राग न घालता शांतपणे या पराभवाचे आपण चिंतन करू, असे ते म्हणाले.

पुन्हा नव्या दमाने गोरगरीब, वंचित, शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. आपण काम करायचं थांबलो तर या गोरगरिबांना कुणीच वाली राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.