मुंबई : लोकसभा निवडणूक निकालात देशात पुन्हा मोदी लाट आल्याचं चित्र असताना महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिलेला आहे. या निवडणुकीत डॉक्टरांची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिकीटांवर निवडणूक लढवणारे 'डॉक्टर' उमेदवार मतमोजणीत आघाडीवर आहेत.


शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी शिवसनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या अमोल कोल्हेंनी शिरुरमध्ये विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले डॉ. सुजय विखे पाटील देखील सध्या आघाडीवर आहेत. बीडच्या विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे या देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. यांच्यासह नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. हिना गावित या देखील विजयी झाल्या आहेत.

डॉक्टर उमेदवारांच्या या यादीत माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा देखील समावेश आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. भामरे विजयी झाले आहेत. तसेच कल्याण मधील शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे देखील विजयी झाले आहेत. तर दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार  विजयी झाल्या आहेत.