मुंबई : महाराष्ट्रातली काँग्रेस कोण चालवतंय तेच कळत नाही, अशा शब्दात नुकतेच भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं आहे. लोकसभेत सुप्रिया सुळेंकरिता मदत करण्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूरच्या जागेबद्दल आश्वस्त करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही याची कल्पना होती. मात्र, दोन्ही काँग्रेसचे नेते 'सिटींग आमदार' 'सिटींग आमदार' करत बसल्यानं माझा नाईलाज झाला, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या खास कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेसचे वरिष्ठ फळीतले नेते, महत्वाच्या खात्यांचा भार सांभाळलेले मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा चर्चेत असलेला भाजप प्रवेश आज अखेर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत झाला. भाजपमधील प्रवेशानंतर पहिल्यांदा त्यांनी 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षेत' विविध प्रश्नांना कधी खुमासदार तर कधी सडेतोड उत्तरं दिली.
तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा तंटा उभा राहिला होता. राष्ट्रवादीचे आमदार तिथं असल्यानं ही जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नव्हती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचंही हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत असलेलं 'विशेष प्रेम' कधी लपून राहिलं नाही. "अजित पवारांचं माझ्यावर फारच प्रेम आहे", अशी मिश्किल टिपण्णीही पाटील यांनी 'तोंडी परीक्षे'त केली. ते म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी आम्ही सहकार्य केलं. त्यांना इंदापूरातून 71 हजार इतका लीड मिळाला. राष्ट्रवादीचे नेते आमच्या घरी येऊन गेले आणि विधानसभेत सहकार्याचं आश्वासन दिलं. मग नंतर काय झालं? दुसरीकडे, मी स्वत: पक्षाच्या तिकिट वाटप प्रक्रियेत सहभागी होऊन मुंबईत अन्य उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना, मला स्वत:च्याच तिकिटाचा पत्ता नाही, या विचारानं मी भांबावून जायचो. आमचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेतेही याबाबत स्पष्ट भूमिका घेत नव्हते. सोनिया गांधींचीही भेट झाली. मात्र, त्यांनीही आपण यात लक्ष घालू, इतकंच म्हटलं, अशी खंतही पाटील यांनी बोलून दाखवली.
'एबीपी माझा'च्या या 'तोंडी परीक्षे'तल्या वर्गाच्या फळ्यावर आजचा सुविचार होता- दीर्घ काळ टिकते तीच खरी पक्षनिष्ठा. त्याचाच संदर्भ घेऊन पाटील यांनी आपल्या पक्षावरील 'निष्ठांतरा'बद्दलही स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले की, पक्षावर निष्ठा असली तरी पक्षाच्या नेत्यांनाही कार्यकर्त्यांवर निष्ठा ठेवावी लागते. मात्र, शेवटी जनताच पक्ष वाढवते. त्यामुळे खरी निष्ठा जनतेशीच असते. माझ्यावर होत असलेला अन्याय इंदापूरच्या जनतेला सहन झाला नाही. त्यांनी मला निर्णय घ्यायला भाग पाडलं.
तरूण नेतृत्वावरील एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी रोहित पवार आणि पार्थ पवार या पर्यायांपैकी रोहित पवार यांची निवड करून राष्ट्रवादीतील भावी स्थितीचे संकेत दिले. अशोक चव्हाण हे बैठ्या राजकारणात तरबेज असले तरी जनतेच्या राजकारणात कमी पडतात तर पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेण्यात उशीर करतात, असं निरिक्षणही त्यांनी मांडलं.