गांधीनगर: गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 56.88 टक्के मतदान झालं. गुजरातच्या एकूण 14,382 पोलिंग स्टेशनवर हे मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालं होतं. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 788 उमेदवार रिंगणात होते, त्यांचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये बंद झालं.  गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता 5 डिसेंबर रोजी होणार आहे. 


गेल्या निवडणुकीत याच भागातील 48 जागांवर भाजपचे उमेदवार निवडूण आले होते, तर 40 जागांवर काँग्रेस विजयी झाली होती. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेससोबत आपचाही समावेश आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे खंभलिया मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यातील इतर प्रमुख उमेदवारांमध्ये जामनगर (उत्तर) येथून निवडणूक लढवणारे क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आणि सुरतमधील जागांवरून भाजपचे आमदार हर्ष संघवी आणि पूर्णेश मोदी तसेच भावनगरमधून पाच वेळा आमदार राहिलेले पुरषोत्तम सोळंकी यांचा समावेश आहे. 


ललित कगथरा, ललित वसोया, रुत्विक मकवाना आणि मोहम्मद जावेद पिरजादा हे काँग्रेसचे विद्यमान आमदार  पहिल्या टप्प्यातून  सौराष्ट्र विभागातील जागांवर रिंगणात आहेत. सातवेळा आमदार राहिलेले आणि ज्येष्ठ आदिवासी नेते छोटू वसावा हे भरूचमधील झगडिया येथून निवडणूक लढवत आहेत.


गुजरातमध्ये (Gujrat Election)आज झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ सहा उमेदवार उभे केले आहेत.


गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आज 89 जागांवर मतदान पार पडलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबर रोजी 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी लागणार आहे. भाजपसमोर यंदा आपच्या अरविंद केजरीवाल यांनी चांगलंच आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसून येतंय.