Nashik Rickshaw Fare Meter : आजपासून नाशिकमध्ये (Nashik) ऑटो रिक्षाची भाडेवाढ (Rickshaw Fare) करण्यात आली असून मीटरप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे नाशिककर या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


नाशिकमध्ये रिक्षा भाडे मीटरप्रमाणे
नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने आजपासून खटुआ समितीच्या शिफारसीनुसार रिक्षा भाड्यात वाढ सुरू करण्यात येणार आहे. नव्या दरांनुसार प्रवासातील पहिल्या दीड किलोमीटरसाठी 27 रूपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 18 रुपये प्रवाशांकडून आकारले जातील. यासाठी नाशिक शहरातील रिक्षा चालकांना 30 नोव्हेबरपर्यंत मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आजपासून मीटरप्रमाणेच त्यांना भाडे स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून कारवाई केली जाणार आहे.


नाशिककरांना निर्णय मान्य नाही?
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत म्हणाले की, एकीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने जरी हा निर्णय घेतला असला तरी मात्र दुसरीकडे नाशिककरांना तो मान्य नाही. जर एखाद्या प्रवाशाला मीटरनुसार दहा किलोमीटर अंतर रिक्षेने प्रवास करायचा असेल तर त्याला नव्या दरानुसार 180 रुपये रिक्षाचालकाला द्यावे लागतील, मात्र तेच शेअरिंग नुसार फक्त 50 रुपये त्याला खर्च येईल. आधीच महागाईने डोकं वर काढलय, कोरोना काळापासून अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अशातच हा भुर्दंड नको असे प्रवासी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे प्रवाशी आज काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. 


पॅसेंजरला मीटर नको
श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष, बाळासाहेब पाठक म्हणाले की, दोन वर्षात इंधन दरवाढ खूप झाली आहे. अजून 20 टक्के भाडे वाढ करायला हवी, तरच रिक्षाचालकांना परवडेल, यात आम्ही समाधानी नाही. कोरोना काळात खूप वाईट दिवस आले होते. मीटर सर्व रिक्षांना आहे, आम्ही त्यानुसार भाडेही आकारू, मात्र पॅसेंजरला मीटर नको आहे, जनजागृती करायला हवी, असे त्यांनी सुचवले. 


प्रवाशांसोबतच रिक्षाचालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो?
एकंदरीतच काय तर या निर्णयाला नाशिककरांकडून होणारा विरोध बघता प्रादेशिक परिवहन विभागाकडून या निर्णयाची कशी अंमलबजावणी केली जाते. आणि त्याला प्रवाशांसोबतच रिक्षाचालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे आज दिसून येईल. आणि नाशिक शहरात मीटर प्रमाणे झालेली भाडे नाशिककरांना परवडणारी आहे का? हे ही निदर्शनास येईल.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik News : सावधान! नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास कारवाई