ED Questioned Vijay Deverakonda: सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) याची ईडीकडून (ED) तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे. लायगर (Liger Movie)  सिनेमाच्या फंडिंग प्रकरणी हैदराबादमध्ये विजय देवरकोंडाची चौकशी करण्यात आली. 


ईडीने बुधवारी (30 नोव्हेंबर) अभिनेता विजय देवरकोंडा याची 'लायगर' चित्रपटाच्या फंडिग प्रकरणी चौकशी केली. हैदराबाद (Hyderabad) येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात अभिनेत्याची सुमारे 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर यासंदर्भात विजय देवराकोंडानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, लोकप्रियता मिळाल्यानंतर काही समस्या आणि दुष्परिणामही भोगावे लागतात. हा एक अनुभव आहे, हे जीवन आहे. मला बोलावल्यावर मी माझं कर्तव्य निभावलं, मी येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं दिली."


ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर विजय देवरकोंडानं माध्यमांनाही आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "एजन्सीनं त्यांच्याकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. मी 9 तास आत राहिलो. त्यांनी (ईडीनं) काही गोष्टींसंदर्भात माझ्याकडे स्पष्टीकरणं मागितली आहेत. ते त्यांचं काम करत आहेत. त्यांनी मला पुन्हा बोलावलं नाही."


'लायगर' चित्रपटासंदर्भात दिली तक्रार


ईडी 'लायगर' चित्रपटाच्या संदर्भात कथित पेमेंट आणि फंडिंगच्या स्रोताची चौकशी करत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या एका वरिष्ठ नेत्यानं या चित्रपटात हवालाचा पैसा गुंतवण्यात आल्याची तक्रार केंद्रीय एजन्सीकडे केली होती. विजयची कथित फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट, 1999) उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.


निर्माती चार्मी कौर यांचीही चौकशी


यापूर्वी 17 नोव्हेंबर रोजी ED ने 'Liger' ची निर्माती चार्मी कौर यांची कथित फेमा उल्लंघनाबाबत चौकशी केली होती. विजय अलीकडेच एका स्पोर्ट्स अॅक्शन फिल्म 'लायगर'मध्ये अनन्या पांडेसोबत दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन ही या चित्रपटाची निर्मिती कंपनी आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन देखील आहे. हा चित्रपट लायगर (विजय देवरकोंडा) आणि त्याची आई बालमणी (राम्या कृष्णन) यांच्या भोवती फिरतो. आई आपल्या मुलाला तेलंगणातून मुंबईत घेऊन येते, कारण तिला तिच्या मुलाला राष्ट्रीय MMA (मिश्र मार्शल आर्ट्स) चॅम्पियन बनवायचं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आहेत.