Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Elections 2022) सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. निवडणूक आयोगाची निवडणुकीची तयारीही अंतिम टप्प्यात आहे.  गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत एकूण पात्र मतदारांपैकी जवळपास निम्मे मतदार 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मात्र, या गटात प्रथमच मतदान करणाऱ्यांचे प्रमाण घटले असल्याची माहिती समोर येतेय.


सर्वच पक्षांनी ताकद लावली पणाला
गुजरातमधील विधानसभेच्या 182 जागांसाठी पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे. दुसरीकडे, गुजरात निवडणुकीत सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचार आणि व्यवस्थापनात आपली पूर्ण ताकद लावली आहे. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवडणूक प्रचाराचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. 27 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत.



11.74 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोंदणी केलेल्या 4.9 कोटी मतदारांपैकी सुमारे 2.35 कोटी 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर एकूण मतदारांपैकी, प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या 11.74 लाख आहे, जी 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील 18-19 वयोगटातील मतदारांच्या संख्येपेक्षा कमी आहे. आयोगाच्या आकडेवारीनुसार, या निवडणुकीत जे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत ते गुजरातच्या एकूण मतदारांपैकी 2.39 टक्के आहेत. तर 2017 च्या निवडणुकीत एकूण 4.33 कोटी मतदारांपैकी 2.7 टक्के म्हणजेच 11.8 लाख मतदार होते आणि 2012 मध्ये ते 3.5 टक्के म्हणजेच 3.81 कोटी मतदारांपैकी 13.3 लाख होते.


 


एकूण मतदारांपैकी एक चतुर्थांश प्रमाण
एकूण पात्र मतदारांपैकी सर्वाधिक 40 वर्षे वयोगटातील मतदार हे 30-39 वयोगटातील आहेत. या गटात 1.21 कोटी मतदार आहेत. गुजरातच्या एकूण मतदारांपैकी हे प्रमाण एक चतुर्थांश आहे. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 30-39 वयोगटातील मतदारांची संख्या 1.12 कोटी होती. दुसऱ्या क्रमांकावर 20 ते 29 वयोगटातील मतदार आहेत, ज्यात 1.03 कोटी मतदार आहेत. तर, 9.8 लाख मतदार 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत. 2017 मध्ये या वयोगटातील 6.3 लाख मतदार होते.


पाच वर्षांत मतदारांची संख्या घटली
पाच वर्षांच्या कालावधीत मतदानात घट 18-19 वयोगट हा एकमेव गट आहे ज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये मतदानात घट झाली आहे. निवडणूक आयोगाने 18 वर्षे वयाच्या लोकांना 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत नावनोंदणी करण्याची परवानगी दिल्याने ही कमतरता अधिक स्पष्ट झाली आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये विशेष मोहीमही सुरू करण्यात आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या


Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्यांदाच उतरणार राहुल गांधी, 'भारत जोडो'च्या विश्रांतीमध्ये घेणार दोन सभा