Gujarat Assembly Election 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीय. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी  मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. आता आपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देखील जाहीर केला आहे. इसुदान गढवी यांना आपने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलाय. गढवी यांची शेतकऱ्यांचे नेते अशी गुजरातमध्ये ओळख आहे. त्यांचे वडील खेराजभाई हे स्वत: शेतकरी असून त्यांचा संपूर्ण परिवार शेतकरी आहे. शिवाय सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर गढवी हे आवाज उठवत असतात त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली असल्याचे मानून त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलाय. 
 
आम आदमीकडून गुरजारतमध्ये गोपाल इटालिया यांच्याकडे विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलीय. त्यामुळे त्यांचाच चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी घोषित होण्याची शक्यता होती. परंतु, आपने सर्व्हे केल्यानंतर त्यांना डावलून गढवी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलाय.  पोलिसात आणि प्रशासनात नोकरी केल्यानंतर इटारिया यांनी राजकारणात उडी घेतली. गुजराती राजकारणात पटेल प्रभावी आहेत, आणि इटालिया याच समाजातून येतात. त्यामुळे भाजपविरोधकांमध्ये त्यांना सहानुभुती आहे. त्यामुळे त्यांना आपकडून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता होती. 


गेल्यावेळीही दिल्ली मॉडेल दाखवत आम आदमीनं गुजरातची निवडणूक लढली होती.  त्यावेळी पाटीदार समाजाचे नेते अशी ओळख असलेले हार्दिक पटेल हे अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत होते. परंतु, त्यावेळी आपने लढवलेल्या तीसपैकी एकाही जागेवर त्यांचं डिपॉझिट वाचलं नव्हतं. आता केजरीवालांनी गुजरातचा ट्रेंड लक्षात घेऊन रणनीती आखलीय. त्यामुळेच नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी करुन त्यांनी भाजपची गोची केली. त्यातच शेतकरी नेता अशी ओळख असलेल्या गढवी यांचा मुख्यमंत्रीपदासाठी देहरा देण्यात आलाय.  


 कोण आहेत इसुदान गढवी?
गुजरातमध्ये शेतकरी नेता अशी ओळख असलेल्या गडवी यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात शेतकरी कुटुंबात झालाय. गढवी यांनी महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. विविध माध्यमांमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत.  


महामंथन नावाच्या शोमधून घराघरात


गढवी यांनी महामंथन नावाचा शो सुरू केला होता. या शोच्या माध्यमातून ते गुजरातमधील लोकांच्या घराघरात पोहोचले आहेत. आपने गुजरातमधील जवळपास 16 लाख लोकांचा सर्व्हे केला. यातील 73 टक्के लोकांनी गढवी यांच्या नावाला पसंती देण्यात आली. या सर्वच गोष्टींचा विचार करून आपने गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला आहे.