महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असताना, घडामोडी वेगाने घडत आहेत. स्वत: अरविंद सावंत यांनीच ट्वीट करुन आपण राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. "खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे," असं सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. परंतु शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला सहजासहजी पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अट ठेवली आहे. "शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावं आणि केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीची आहे. तसंच पाठिंब्यासंदर्भात शिवसेनेने प्रस्ताव देण्याचाही पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
अरविंद सावंत यांचं ट्वीट
अरविंद सावंत यांनी सकाळी ट्वीट करुन राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे."