Girish Mahajan On Exit Poll: लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचे (Exit Poll 2024) निकालसमोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनूसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे दाखवले जात आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आणि सांगितल्याप्रमाणे 'चारशे पार'चा आकडासुद्धा पार करणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. मात्र किमान 35 जागा महायुतीला मिळतील, उद्या तुम्हाला ते पाहायला मिळेल, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्यात कमी जागा येत आहेत, हे खरं आहे. यामागील महत्वाचं कारण म्हणजे वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणाचा प्रश्न असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. काही ठिकाणी उमेदवार बदलायला पाहिजे होते, ते मात्र झालं नाही, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होत असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितले. गिरीश महाजनांच्या या विधानमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर देखील टीके केली. एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नाही. गिरीश महाजन जे बोलत आहेत, ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही- एकनाथ खडसे
एक्झिट पोलचा (Exit Poll) निकाल पाहता 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसतय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी माझा आणि सी व्होटर्सचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोल्सचा निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.
मविआ आणि महायुतीमध्ये रस्सीखेच
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला होता. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठे यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात दिसली रस्सीखेच. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज. महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य. मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज. शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य. 2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Exit Poll 2024 LIVE Updates : देशात भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळणार, लाईव्ह ब्लॉग