जळगाव : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) समोर आले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, विविध सर्वे समोर आले आहेत. या सर्वेमध्ये मोदी जी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच, असे दाखविले जात आहेत. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान तर होणारच आहे. शिवाय आम्ही सांगितल्याप्रमाणे चारशे पार सुद्धा करणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राज्यातील एक्झिट पोलवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात आमच्या जागा कमी असल्याचं दाखविले जात असले तरी किमान पस्तीस जागा आम्हाला मिळणार आहेत. उद्या ते तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यात जागा कमी येत आहेत हे खरे आहे. त्या मागील कारण बघितले तर वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षण प्रश्न याचबरोबर काही उमेदवार बदलायला पाहिजे होते ते झाले नाही. यामुळे या जागा कमी होत असल्याचं दिसत असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी दिली आहे.
गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर निशाणा
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेले दिसत नाही. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. खडसे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ते कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांना ही कळत नाही. ते जे बोलत आहेत ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'सिन्नरमधून एक लाखाचा लीड, मी निवडून येणारच', निकालाआधीच राजाभाऊ वाजेंना विजयाचा ठाम विश्वास!