मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीरची संपत्ती समोर आली आहे. गंभीर हा दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरला आहे. गौतम गंभीरची संपती 147 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.


गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गंभीरने 2017-18 साली भरलेल्या आयटी रिटर्न्समध्ये 12.40 कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवलं आहे. गंभीरवर 34 कोटींपेक्षा अधिक रकमेचं बँकेचं कर्ज आहे. याच कालावधीसाठी त्याची पत्नी नताशाने भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये 6.15 लाख रुपयांचं उत्पन्न तिने दाखवलं आहे.

गंभीरने दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, मात्र हिंदू कॉलेजमधील पदवी शिक्षण तो पूर्ण करु शकलेला नाही, असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. गंभीरच्या विकीपीडिया पेजवर मात्र तो पदवीधर असल्याची माहिती दिसते. गंभीरकडे पाच चारचाकी आणि एक दुचाकी आहे.

आपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार अरविंद सिंग लवली यांच्याविरोधात गंभीर निवडणूक लढवत आहे. लवली यांची संपत्ती 6.8 कोटी रुपये आहे.

दिल्लीतून एकूण 349 उमेदवार लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात आहेत. गंभीरनंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे महाबल मिश्रा हे दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 45 कोटींच्या घरात आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची संपत्ती 4.92 कोटी रुपये आहे.

दुसरीकडे, व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरला आहे. त्याची एकूण संपत्ती 12.14 कोटी रुपये आहे. विजेंदरने 2008 मधील ऑलिम्पिक्समध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं. ऑलिम्पिक्समध्ये पदक कमावणारा तो पहिलाच भारतीय बॉक्सर ठरला होता.