नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरला निवृत्त होऊन तीन वर्ष लोटली आहेत. आता गंभीर नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. गौतम गंभीर नवी दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्ष गंभीरला लोकसभेचं तिकीट देणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे.


नवी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे आहेत. परंतु गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. त्यामुळे यावेळी सातपैकी काही खासदारांना भाजपमधूनच विरोध होई लागला आहे. या अडचणीवर पर्याय म्हणून भाजप नव्या उमेदवारांना संधी देऊ शकतं. त्यामुळे नवा उमेदवार म्हणून गंभीरला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गौतम गंभीरचा स्टार कॅम्पेनर म्हणून भाजप चांगलाच फायदा उचलेल.

गौतम गंभीर आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोघांचे जवळचे संबंध आहेत. गंभीर दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता, तेव्हा अरुण जेटली दिल्ली क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. गंभीर हा जेटलींचा आवडता खेळाडूदेखील आहे.

दरम्यान गौतम गंभीरचं गेल्या महिन्यातलं एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती.