बीड : जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंडित आणि पवार कुटुंबीयांचा राजकीय दबदबा राहिला आहे. गेवराई (Georai) मतदारसंघात 1961 पासून पवार व पंडित या दोन कुटुंबीयांभोवतील विधानसभेचं राजकारण फिरलं आहे. आमदारकीची माळ आलटून पालटून या दोन घराण्यांकडेच राहिली आहे. यंदाही पवार आणि पंडित कुटुंब विधानसभेच्या मैदानात आहेत. मात्र, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार केल्यास पंडित विरुद्ध पंडित असाच सामना येथे होत आहे. तर, विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेल्या लक्ष्मण पवार (Laxamn pawar) यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी लक्ष्मण पवारांबाबत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने मतदारसंघात राजकीय स्थित्यंतरे वेगळीच पाहायला मिळाली.
गेवराई मतदारसंघ हा महायुतीतील जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आला, त्यामुळे महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित मैदानात आहेत. तर, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित निवडणूक लढवत आहेत. सलग दोनवेळा भाजपकडून आमदार राहिलेले लक्ष्मण पवार यांनी यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पंडित कुटुंबातील दोन्ही उमेदवार हे नात्याने काका-पुतण्या आहेत. मात्र, तिन्ही उमेदवार मराठा असल्याने जातीय समीकरणे येथे सर्वांना समान लागू पडतात. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाचा फटका किंवा फायदा याला अधिक महत्त्व या मतदारसंघात नसेल. मात्र, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धींमध्ये यंदा कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल. दरम्यान, मयुरी मस्के यांनीही मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात कोणाला लीड?
लोकसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे 6 मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक असलेल्या गेवराई मतदारसंघातून भाजप आमदार लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 39 हजार मतांचा लीड मिळाला होता. येथून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंची पिछेहाट झाली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत येथे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, यंदा लक्ष्मण जगताप यांना भाजपने उमेदवारी नाकारत गेवराई मतदारसंघाची जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?
बीड जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या गेवराई मतदारसंघात यंदा महायुतीकडून विजयसिंह पंडित विरुद्ध महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित यांच्यात थेट लढत होत आहे. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून लक्ष्मण पवार हे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले होते. मात्र, त्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट देण्यात आलं नाही.लक्ष्मण पवार यांनी 6792 मतांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित यांचा पराभ केला होता. तर, अपक्ष लढलेल्या बदामराव पंडित यांना 50 हजार 894 मतं मिळाली होती. भाजपच्या विजयी उमेदवार लक्ष्मण पवार यांना 99 हजार 625 मतं मिळाली होती. तर, विजयसिंह पंडित यांना 92 हजार 833 मतं मिळाली होती.