गडचिरोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड राहिलेला हा मतदारसंघ मात्र मोदी लहरीत काँग्रेसचा गड वाहून गेल्याचं चित्र आहे. गडचिरोलीचे आमदार अशोक नेते यांना 2014 मध्ये भाजपने लोकसभेत पाठवल्याने गडचिरोलीसाठी डॉ. देवराव होळी यांना संधी दिली. मोदी लहरीत त्यांचा ऐतिहासीक विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा 51, 905 मतांनी पराभव केला.

मागील निवडणूक सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन लढणाऱ्या डॉ. होळी यांच्यापुढे यावेळी पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान आहे.  त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याची भिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी खासदार अशोक नेते यांचं तिकीट कापण्यासाठी दबाव गट बनवला होता. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळू नये, यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास निष्ठावंत कार्यकर्ता आणि आदिवासी समाजसेवक म्हणून ओळख असणारा चेहरा म्हणून प्रकाश गेडाम यांना भाजप रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

गेल्यावेळी या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा सांगण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही आपला दावा अजून सोडलेला नाही. लोकसभेसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे डॉ. नितीन कोडवते आता निदान विधानसभेत तरी तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत.

डॉ. नितीन कोडवते काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. विदर्भातले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा त्यांना पाठिंबा होता. या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. जिल्ह्यात काँग्रेसचे तीन गट आहेत. त्यात नामदेव उसेंडी आणि विजय वडेट्टीवार हे दोन गट प्रमुख आहेत. वडेट्टीवार यांचा डॉ. कोडवते यांना पाठिंबा असल्याने उसेंडी थेट दिल्लीला जाऊन ठिय्या मांडला आणि शेवटी डॉ. उसेंडीनी आपली उमेदवारी जमवलीच आणि नितीन कोडवते यांना विधानसभेत संधी देऊ असं आश्वासन दिलं. आता नामदेव उसेंडी आपल्या आश्वासनाची पूर्तता करणार का, हा प्रश्न विचारला जातोय.  डॉ. कोडवते यांना उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघातली चुरस वाढणार आहे.

2014 विधानसभा निवडणूक

1. डॉ. देवराव होळी - भाजपा  70,185

2.  भाग्यश्री आत्राम - राष्ट्रवादी कॉंग्रेस 18,280

3. सगुणा तलांडी - काँग्रेस 17,208

गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील प्रश्न आणि रखडलेले महत्वाचे प्रकल्प

1.) वडसा - गडचिरोली रेल्वे मार्ग :  हा मार्गाचं काम पूर्ण करणं ना काँग्रेसला जमलं ना भाजपला मुहूर्त सापडला. विद्यमान खासदार, आमदार आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी ह्यांनी मोठं मोठी आश्वासन अनेकवेळा दिली. पण पुढे काहीच नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटल्याचा दावा करत नागपुरातून इ-भूमीपूजन केलं, मात्र अजूनही प्रत्यक्षात कामाला मुहूर्त मिळालेला नाही. हा प्रकल्प तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.

2) कारवाफा सिंचन प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकल्पाने जनतेचा फायदा असल्याचं सत्ताधारी सांगतात मात्र स्थानिकांचा याला विरोध आहे. स्थानिक आमदारानी लक्ष न दिल्याने शासन ही ह्याकडे दुर्लक्ष करत आहे.

3) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून वेगळं होऊन स्वतंत्र गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासाठी
गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र ह्या भव्य विद्यापीठासाठी अजूनही जमीन उपलब्ध करून दिलेली नाही. विद्यापीठाला 200 एकर जागेची गरज आहे.

कोणते प्रकल्प मार्गी लागले

1) काँग्रेसच्या काळात सुरू झालेला चिंचडोह बॅरेज प्रकल्प भाजपच्या काळात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चिंचडोह बॅरेज गडचिरोली मतदारसंघातला महत्वपूर्ण सिंचन प्रकल्प ठरणार आहे. यामुळे या भागातील 11,510 हेक्टर शेती सिंचनाखाली येईल.  चिंचडोह बॅरेज प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे. त्यातही या प्रकल्पाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल.

2) कोडगल बॅरेजने 10,199 हेक्टर सिंचन क्षमता असणारा 6,620 हेक्टर क्षेत्राला सिंचनात आणणाऱ्या प्रकल्पाला सुरुवात

येणाऱ्या काळात गडचिरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची भाजप आणि काँग्रेस यात दुहेरी लढत असली तरी या दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका दोन्ही उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.