मुंबई : मुंबई काँग्रेसमधील घडामोडींमुळे नाराज असल्याच्या भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असे संकेत मिलिंद देवरांनी ट्विटरवरुन दिले आहेत.

'पक्षांतर्गत गोष्टींबाबत जाहीर वाच्यता करण्याची इच्छा नाही, मात्र एका मुलाखतीत केलेल्या टिपण्णीमुळे मुंबईतील विविधतेचं प्रतीक म्हणून कायम राहण्यासाठी कटिबद्ध असलेल्या काँग्रेसबाबत आपली निष्ठा राखण्यासाठी या गोष्टींचा पुनरुच्चार करण्याशिवाय माझा इलाज नाही' असं मिलिंद देवरांनी एकामागून एक केलेल्या ट्वीट्समध्ये म्हटलं आहे.


'एकमेकांविरोधात लढणाऱ्या नेत्यांसाठी मुंबई काँग्रेस हे क्रिकेटचं मैदान होऊ शकत नाही.' अशा शब्दात देवरांनी संताप व्यक्त केला आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात नागरिकांना एकत्र आणण्याची गरज आहे, असंही देवरा म्हणतात.


'मुंबई काँग्रेसमधील घडामोडींमुळे मी नाराज आहे. लोकसभा निवडणुका लढवण्याबाबत माझा पवित्रा पक्षाला माहित आहे. केंद्रीय नेतृत्व आणि पक्षाच्या तत्त्वनिष्ठेवर माझा पूर्ण विश्वास आहे' असंही मिलिंद देवरांनी पुढे म्हटलं आहे.


'मुंबईतील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी टीम म्हणून एकत्र यावं. आपण पक्ष आणि अध्यक्षांसाठी हे करुच शकतो' असं म्हणत देवरांनी ट्वीटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टॅग केलं आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असं देवरांनी सांगितलं. आपल्या भावना राहुल गांधींकडे पोहचवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


संजय निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. त्यामुळे देवरा यांनी एकप्रकारे निरुपम यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली आहे. यापूर्वीही निरुपम यांच्याविरोधात पक्षातून सूर उमटला होता. कृपाशंकर सिंह, नसीम खान यांच्या गटातून संजय निरुपम यांना कायमच विरोध होत आला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.