नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा आज स्वराज्य पक्षात पक्षप्रवेश पार पडला. सुभाष साबणे 1999,2004,2014 या निवडणुकीमध्ये तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. शिवसेनेच्या उमेदवारीवर सुभाष साबणे जिंकून आलेले आहेत. सध्या ते भाजपमध्ये होते. भाजप सदस्यत्वाचा काल राजीनामा देत आज स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.साबणे यांच्या पक्षप्रवेशाने परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढणार आहे.
माजी आमदार सुभाष साबणे यांनी भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी देत स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर साबणे यांनी बिलोली-देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली होती. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या विरोधात जितेश अंतापूरकर हे उमेदवार होते. जितेश अंतापूरकर पोटनिवडणुकीत विजयी झाले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी साबणे यांनी भाजपाकडून तिकीट मागितल्याच्या चर्चा होत्या. मात्र, जितेश अंतापूरकर यांच्या काँग्रेसमधून भाजपमध्ये झालेल्या प्रवेशामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी काल (शनिवारी) भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लाडकी बहिण योजना समिती अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य या तिन्ही पदांचा राजीनामा दिला.
राजीनामा देताना काय म्हणाले साबणे?
लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के प्रामाणिक काम केलं. अडीच वर्ष सातत्याने पक्षाचं काम सुरु होतं, मात्र ज्या नेत्यांने लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचं काम केलं नाही, त्याला भाजपात घेऊन विधानसभा निवडणूकीची उमेदवारी दिली जातं आहे, असं सांगत माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या जितेश अंतापूरकर यांनाच महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्यामुळे सुभाष साबणे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.