नवी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे आहेत. परंतु गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. त्यामुळे यावेळी सातपैकी काही खासदारांना भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे. या अडचणीवर पर्याय म्हणून भाजप नव्या उमेदवारांना संधी देऊ शकतं. त्यामुळे नवा उमेदवार म्हणून गंभीरला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गौतम गंभीरचा स्टार कॅम्पेनर म्हणून भाजप चांगलाच फायदा उचलेल.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात क्रिकेटमधून गंभीरने निवृती घेतली होती. आता तो राजकीय इनिंग सुरु करत आहे. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीच्या राजकारणावर भाष्य करताना दिसत आहे. यापूर्वी त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच तो वारंवार केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. तेंव्हापासून गंभीर राजकारणात प्रवेश करणार करण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आज अखेर गौतमने भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपातील प्रवेशाबाबत गंभीर म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुरदृष्टीमुळे मी प्रेरित झालो आहे. मी भाजपात प्रवेश करत असल्याने मला याचा खूप आनंद होत आहे.
दरम्यान राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे की, गंभीर दिल्लीच्या सुरेंद्र नगरमध्ये राहतो, हा भाग नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे गंभीरला या मतदारसंघातून उतरवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. सध्या भाजपच्या मिनाक्षी लेखी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदार आहेत. एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांच्या सर्व्हेत भाजपला दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
गौतम गंभीर आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोघांचे जवळचे संबंध आहेत. गंभीर दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता, तेव्हा अरुण जेटली दिल्ली क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. गंभीर हा जेटलींचा आवडता खेळाडूदेखील आहे.