मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी 'करो या मरो'ची लढत ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यास अनुत्सुक असलेल्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसकडून पुन्हा मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचीही मनधरणी करण्यात यश आल्याची माहिती आहे. प्रिया दत्त पुन्हा एकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबईत सभा घेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. यावेळी प्रिया दत्तही व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यानंतरच प्रिया दत्त निवडणुका लढवण्यास राजी झाल्याचं वृत्त येत आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या पूनम महाजनांकडून पराभवाचा धक्का बसला होता.

सुरुवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 'आता माझी मुलं आहेत. नुसतं निवडणूक जिंकून होणार नाही. पाच वर्ष काम केलं पाहिजे, नाहीतर ते अन्यायकारक ठरेल. म्हणून मी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र पक्ष जी जबादारी देईल, ती मी पार पाडेन', असं प्रिया दत्त म्हणाल्या होत्या.

आता मात्र 2014 मध्ये हातातून निसटलेली खासदारकीची जागा पुन्हा बळकावत पराभवाचा वचपा काढण्याची संधी प्रिया दत्त यांना आहे. अभिनेत्री नगमा, कृपाशंकर सिंह यानीही उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर दावा सांगितला होता.

मुंबईत काँग्रेसकडून कोणकोण रिंगणात उतरण्याची चिन्ह?

उत्तर पश्चिम मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम
दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा
दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड किंवा भालचंद्र मुणगेकर
उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त