मुंबई : शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सभा घेत आहेत. त्याअनुषंगाने आज औसा मतदारसंघात ते सभेसाठी आले असता निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅग तपासण्यात आली आहे. यावेळी, उद्धव ठाकेरंनी माझ्यासारखंच मोदींचीही आज बॅग तपासा, मोदींची आज सोलापुरात सभा होत असून, त्यांची बॅग तपासा असे म्हटले होते. उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची औसा मतदारसंघातील सभा झाल्यानंतरही त्यांना सुरक्षा यंत्रणांच्या नियमांचा सामना करावा लागला. कारण, मोदींच्या सभेचं कारण देत उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण काही काळासाठी रोखण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांना औसा येथील हेलिपॅडवरुन हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी नाराजी व संताप व्यक्त केला आहे.
औसा येथील सभा संपल्यावर उद्धव ठाकरे उमरग्याच्या सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरला येणार असल्यामुळे हवाई उड्डाणं करण्यास उद्धव ठाकरेंना प्रशासनाकडून परवानगी नाकारल्याची घटना घडली. विशेष म्हणजे सोलापूर आणि लातूर, धाराशिव या जिल्ह्यात बरेच अंतर आहे. तरीही, सुरक्षा यंत्रणांकडून या जिल्ह्यातील संपूर्ण आसमंत उड्डाणं थांबवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान सोलापूर विमानतळावर लॅंडिंग होत नाही, तोपर्यंत शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास ATC कडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यास विलंब होत असल्याची तक्रार आणि संताप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
औसा मतदारसंघात बॅगची तपासणी
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला.
शिंदेंच्या आमदाराची प्रतिक्रिया
दरम्यान, उद्धव ठाकरेंचें उड्डाण थांबवल्याबाबत शिवसेना शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान यांच्या सुरक्षेचा निर्णय पोलीस घेतात, उद्धव ठाकरेच नाही तर एकनाथ शिंदे असते तरीही विमान थांबवले असते, हे एजन्सीचं काम आहे. एवढं गलिच्छ राजकारण करण्यासाठी लोकांकडे वेळ नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
हेही वाचा
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल